नाशिक - शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलचे वाढत आहेत. सद्यस्थितीत पेट्रोल 112.13 तर डिझेल 101.13 रुपये लिटर दराने ग्राहकांना खरेदी करावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
दररोज नवनवे उच्चांक
देशात पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दराने ही शंभरी ओलांडली असली, तरी इंधन दरवाढ थांबायला तयार नाही. 14 ऑक्टोबरला नाशिकमध्ये डिझेलचे दर 100.27 रुपये झाले होते, मात्र चारच दिवसात त्यात मोठी वाढ होऊन डिझेल 101.13 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. त्यापाठोपाठ पेट्रोलमध्येदेखील वाढ झाली असून प्रतिलिटर 112.13 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. इंधन दरवाढीमुळे सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून इंधन दररोज नवनवे उच्चांक गाठला असल्याने नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
तेलाचा बॅरल 80 रुपये डॉलर
जागतिक कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचा बॅरलचा भाव 80 रुपये डॉलर झाल्यामुळे तेलाची आयात खर्चिक बनले आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य इंधनावरील कर कमी करण्यास पुढे आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अनलॉकनंतर व्यवसाय सुरळीत सुरू असताना दुसरीकडे मात्र गेल्या दोन वर्षापासून लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. त्यामुळे महिन्याचे आर्थिक बजेट बसवण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या
मालवाहतूक भाडे वाढल्याने वस्तू महागल्या आहेत. डिझेलचे दर झपाट्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम डाळी, तांदूळ, गहू, तेल यांच्या किंमती वाढण्यात झाला आहे. मालवाहतुकीचे दर वाढत असून इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर थेट परिणाम होत असल्याचे धान्य किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला केंद्र सरकार खाद्य तेलाचे दर कमी व्हावेत, याकरिता प्रयत्न करत असताना इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे.