नाशिक - एखादा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी रुजू झाल्यावर त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी आणि त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी अनेक अधिकारी, ठेकेदार काही ना काही निमित्त शोधत असतात. त्यातच दिवाळीसणाचे औचित्य साधून उच्च भेटवस्तू, मिठाई देण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांची मुक्त स्पर्धा लागत असते आणि अधिकारीही त्याचा आनंदाने स्वीकार करताना दिसून येतात. मात्र, नाशिकचे महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिवाळीनिमित्त कोणतीही मिठाई आणि भेटवस्तू देण्यात येऊ नये, असे सांगणारे फलक कार्यालयाबाहेर लावले आहेत.
गरिबांसोबत साजरी करा दिवाळी -
कैलास जाधव यांनी दिवाळीत मला भेटवस्तू आणि मिठाई देण्याऐवजी शहरातील गरीब, गरजूंना मदत करा, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करा, असे आवाहन केले आहे. शहरात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त ही तीन महत्त्वाची पदे आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांनाकडे त्या त्या विभागाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असल्याने ते थेट जनतेच्या संपर्कात येत असतात. त्यात एखादा अधिकारी नवनियुक्त असेल तर त्याच्याजवळ जाण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जातो.
हेही वाचा - ठाण्याचा फराळ परदेशात! कोरोनाचा इफेक्ट नसल्याचा व्यावसायिकांचा दावा
जाधव यांचा आदर्श
दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने अधिकाऱ्यांकडे भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांची लगबग वाढू लागली आहे. काही अधिकारी या भेटवस्तुंचा स्वीकार करून सन्मान ठेवत असतात. मात्र, कोरोना काळात या परंपरेला फाटा देत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी आपल्या कार्यालयाबाहेर एक फलक लावून आदर्श ठेवला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, मिठाई स्वीकारले जाणार नाही, असा आशय त्या फलकात आहे. त्याऐवजी शहरातील झोपडपट्टी परिसर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे गरजूंना वस्तूंचे वाटप करावे तसेच मास्क,सॅनिटाझरचे वाटप करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - फटाकेमुक्त दिवाळी : काय म्हणतायेत व्यावसायिक?