नाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी मद्याचा भरपूर आस्वाद घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात मागील महिन्याभरात तब्बल 27 लाख लिटर दारूची विक्री झाली. यात शासनाला 128 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सुरुवातीचे दीड महिना महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री करण्यास मनाई केली होती. या काळात तळीरामांचे मोठे हाल झाले होते. तसेच मोठ्या प्रमाणात मद्याचा काळाबाजारदेखील झाला होता. मात्र नंतर महसूल मिळावा, या उद्देशाने सरकारने मद्यविक्री करण्यासाठी नियम तसेच अटी-शर्तींवर परवानगी दिली. मद्य दुकाने सुरू होऊन आता महिना लोटला असून एकट्या नाशिक जिल्ह्यातील मद्यशौकिनांनी तब्बल 27 लाख लिटर दारू रिचवली आहे.
नाशिक जिल्ह्यात मद्य उत्पादनाचे चार कारखाने आहेत, त्यात तीन कारखाने विदेशी मद्याचे असून एक कारखाना देशी मद्याचा आहे. मद्यविक्री व्यवसायातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला 128 कोटींचा महसूल मिळाला असून, त्यापैकी 43 कोटी 33 लाख रुपये जिल्ह्यातील कोरकोळ मद्यविक्रीतून मिळाला आहे. उर्वरित महसूल हा मद्य उत्पादनातून मिळाला आहे. मद्यविक्री दुकाने सुरू होताच तळीरामांनी दुकानातून मद्यखरेदी करण्यास पसंती दिली; मात्र नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन मद्यविक्रीला अत्यअल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे राज्य उत्पादन विभागाने सांगितले आहे.
महिन्याभरात एकूण मद्यविक्री 26 लाख 7 हजार
देशी मद्य 14 लाख 33 हजार
विदेशी मद्य 8 लाख 90 हजार
बियर 6 लाख 93 हजार.