नाशिक - शहरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन बँकांचे एटीएम मशीन फोडून तब्बल 32 लाख रुपये लंपास केले. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना प्रकरणाच्या तळाशी गेल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. यात बँकांनी रिझर्व बँकेच्या निर्देशांचे योग्य पालन केले नसल्याचे आढळून आले.
![Nashik City Commissioners convened a meeting of representatives from all banks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-policebankofficermeeting_23082019134149_2308f_1566547909_833.jpg)
एटीएम मशीन फोडीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यात प्रामुख्याने एटीएम धारक बँकांनी भारतीय रिझर्व बँकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने देण्यात आलेल्या अनेक मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही एटीएमजवळ बँकांनी सुरक्षारक्षक नेमलेच नव्हते.
![Nashik City Commissioners convened a meeting of representatives from all banks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-policebankofficermeeting_23082019134149_2308f_1566547909_113.jpg)
यावर नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बँक प्रतिनिधींची तात्काळ बैठक बोलावली होती. पोलीस मुख्यालयातील 17 नंबर बॅरेकमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नाशिक शहरातील विविध बँकांचे एकूण 120 प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
![Nashik City Commissioners convened a meeting of representatives from all banks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-policebankofficermeeting_23082019134149_2308f_1566547909_898.jpg)
यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, शहरातील सर्वच एटीएम मशीन बाहेर 24 तास सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. सुरक्षारक्षक हे शारीरिक दृष्ट्या सशक्त असले पाहिजेत. एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा सुस्थितीत आणि त्याची स्टोरेज क्षमता अधिक प्रमाणात असायला हवी. धोक्याची सुचना देणाऱ्या यंत्रणा चांगल्या दर्जाची असली पाहिजे. त्या सोबतच भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांची पूर्तता सर्वच बँकांनी करण्याचे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.