नाशिक - महानगरपालिकेला थकबाकीदारांकडून वसुली करताना तारेवरची कसरत करावी लागते. महानगरपालिकेने मार्च अखेरची तयारी सुरू केली असून, वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांच्या दारात ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून ही थकबाकी वसुली मोहीम सुरू होणार असून यात एका लाखापेक्षा अधिक रकमेची घरपट्टी थकीत असलेल्या 1 हजार 978 बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. या थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर महानगरपालिकेचा बोजा चढवला जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.
मार्च महिन्याची सुरुवात होताच महानगरपालिकेने कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. यंदा रेकॉर्डब्रेक थकबाकी वसुली करण्याचा निर्णय करवसुली विभागाकडून घेण्यात आला असून, पालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. 2019 -20 या कालावधीत आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांसह 359 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 136 कोटी 88 लाख रुपये वसूल करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. यात घरपट्टीतून 99 कोटीचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र महानगरपालिकेचा करवसुलीचा आकडा दीडशे कोटी रुपये ठेवला असून, त्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
हेही वाचा -
Live : विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज
आता पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा, आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी