नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात ( Nashik District Hospital ) सुरू असलेले बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रॅकेट नाशिक ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केले आहे. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक ( Civil employee arrested ) करण्यात आली असून, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारणासाठी दिले बोगस प्रमाणपत्र : आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस अंमलदारांना कर्मचार्याने बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे, या घटनेमुळे पोलीस दलासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील संशयित कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि धुळे येथील तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्य चिकित्सकांचे नाव समोर आले असून दोन अतिरिक्त शल्यचिकित्सक कारवाईच्या भीतीने नॉट रीचेबल झाले आहेत.
वैद्यकीय अधिकारी नॉट रिचेबल : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि ग्रामीण प्रशासनाचे निरीक्षक खर्गेंद्र टेंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशासकीय कार्यालयातील मुंबई पोलीस दलात कार्यारत असलेल्या शिपायाची नाशिक ग्रामीण दलात बदली करण्यासाठी अर्ज आला होता. या अर्जासोबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. नमूद आजाराबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पडताळणी केली असता जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या सह्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रमाणपत्र रुग्णालयाचा लिफ्टमॅनने बनवून देत त्यावर वैद्यकीय अधिकारांच्या सह्या घेतल्याचं तपासात समोर आले आहे. तालुका पोलिसांनी संशयित लिपिक हिरा कनोज याला पाच दिवसापूर्वी अटक केली होती, त्यानंतर सिव्हिल कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे याला अटक करण्यात आली आहे. यानंतर दोन अतिरिक्त शल्यचिकित्सक कारवाईच्या भीतीने नॉट रीचेबल झाले आहेत.
रॅकेट असल्याचा संशय : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय मधून बोगस वैद्यकिय प्रमाणपत्र काढून देण्यासाठी काही कंत्राटी, काही नियमित वर्ग चारचे कर्मचार्यांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचं रॅकेट असल्याचा आरोप आहे. पोलीस, शिक्षक व ज्यांना बदली हवी असेल ते प्रमाणपत्रासाठी साधारण पंचवीस हजारा पासून ते एक लाखापर्यंत खर्च करतात, प्राथमिक तपासात आतापर्यंत 25 पोलीस कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय, या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करणार असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
लिफ्टमॅन गांगुर्डे चे कारनामे : कांतीलाल गांगुर्डे तीस वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात लिफ्टमन म्हणून कार्यरत आहे. मात्र तो कधीही लिफ्टवर दिसला नाही, नेमून दिलेले स्वतःचे काम सोडून तो बनावट दाखले देण्याची काम करत असल्याचे समोर आल आहे. त्यांने आतापर्यंत हजारो बनावट दाखले देत मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले आहे. त्याचे राहणीमान उच्चभ्रू लोकांना लाजवेल असे आहे. तो अनेकदा महागड्या वाहनातून फिरताना दिसतो, कोणताही दाखला मिळवून देण्यात गांगुर्डे माहीर आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्याने दबदबा निर्माण केला होता, एकूणच अर्थकारणामुळे गांगुर्डे जिल्हा रुग्णालयात चर्चेचा विषय ठरलेला आहे, त्याने कमावलेल्या आता पर्यंतच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी केली आहे.