नाशिक - जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीकडून सुहास कांदे हे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र येथे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली आहे. भाजपकडून सुहास कांदे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. असे असले तरी पवारांनी प्रचारातील पोस्टरवर भाजपच्याच नेत्यांचा फोटो लावल्याने मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा... स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हाच सत्ताधाऱ्यांचा धंदा - अजित पवार
माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. भाजपचा त्यांना पाठींबा नसल्याचे वरकरणी बोलले जात असले तरी, पवारांनी पोस्टरवर भाजप नेत्यांचा फोटो वापरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या या कृतीला भाजपची मुक संमती असल्याचेही बोलले जात आहे.
हेही वाचा... 'बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल', चिमूर मतदारसंघातील खेड येथील घटना
भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवारांकडून प्रचारात भाजपच्याच प्रोटोकॉलचा वापर
युती होणार की नाही, यावर नांदगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होते. त्यामुळे येथे भाजप व सेनेच्या दोन्ही इच्छुकांनी आपल्या परीने मोर्चेबांधणी केली होती. युती झाल्यानंतर मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. तेव्हा भाजपतर्फे इच्छुक असलेल्या पवारांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निरोप न आल्याचे सांगण्यात येत आहे. पवार आणि गिरीश महाजन यांचे असलेले सलोख्याचे संबंध जिल्ह्यात परिचीत आहेत. याचाच फायदा घेत पवारांकडून भाजपच्या प्रोटोकॉलचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पवारांच्या उमेदवारीला एक प्रकारे भाजपची मूकसंमती तर नाही ना? असा सवाल तालुक्यातील जनतेला पडलेला आहे.