नाशिक - परतीच्या पावसाने राज्यातील इतर भागांप्रमाणे नांदगांव तालुक्यातही धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा फटका इतर पिकांसोबत द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सोमवारी या भागाच्या खासदार डॉ. भारती पवार आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नुकसान झालेल्या द्राक्ष बागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
हेही वाचा... नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार
नांदगाव तालुक्यातील येसगाव, अजंदे, मथुररपाडे यासह आजूबाजूच्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी केला व तालुका कृषी अधिकारी यांच्यासह मंडल अधिकारी यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादाराव जाधव भाजप युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्यासह ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा... पुण्यात फुलांचे भाव कोसळले, शेतकरी हवालदिल
मायबाप सरकारने तातडीने दखल घेऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर ज्या कंपनीचा विमा आहे, त्या कंपनीने तत्काळ आम्हाला मदत करावी, तसेच शासनाने देखील मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.