नाशिक - उपनगर व नाशिकराेड (Nashik Crime) येथे दहशत माजवणाऱ्या धनेधर गँगच्या 17 जणांवर दरोड्याच्या गुन्ह्यात पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अखेर मोक्काची सहावी कारवाई केली आहे. नागरिकांच्या दुकानात बळजबरीने घुसून तलवार, कोयत्यांचा धाक दाखवून, तसेच दुकानदारांच्या गळयावर तलवार ठेऊन गल्ल्यातील रोख रक्कम बळजबरीने काढुन मारहाण करणारे हे दराेडेखाेर अखेर गजाआड हाेणार असल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला आहे.
टोळीतील सदस्यांविरूध्द एकूण 46 गुन्हे दाखल -
संघटीत टोळीचा मुख्य सूत्रधार सिद्ध्या उर्फ सिद्धांत सचिन धनेधर (19 रा. चव्हाण मळा, जयभवानीरोड, नाशिकरोड), पेन्या उर्फ वैभव नितीन जाधव (18 रा. जयभवानीरोड), आदित्य दीपक सावंत उर्फ छोटू दादा (रा. देवळाली गांव), सूरज बरुदी भारद्वाज (रा. फर्नांडिसवाडी), तेजस अनिल गांगुर्डे (25 रा. देवळालीगाव), अनिकेत राजू जॉन उर्फ केरला (21, रा. सुभाषरोड), ऋषीकेश अशोक निकम (रा. गुलाबवाडी), प्रतिक राठोड (रा. फर्नांडिसवाडी), भिमा मनोज श्रीवंत (21 रा. मालधक्कारोड), उमेश संजय बुचडे (22, रा. देवळालीगाव), उमेश दादाराव धोंगडे(19 रा. मथुरारोड, विहीतगाव), नदीम उर्फ बडे पप्पू पठाण (20 रा. मालधक्का रोड), हुसेन फिरोज शेख (19, रा. सिन्नरफाटा), शुभम उर्फ बाशी हरबीर बेहनवाल (20, रा. फर्नांडिसवाडी), राहुल अजय उज्जेनवाल (20, रा. जयभवानीरोड) आणि दोन विधी संघर्षीत मुले यांच्यावर माेक्का कारवाई करण्यात आली आहे. धनेधर याने साथीदारांच्या मदतीने गँग तयार करून व घातक हत्यारे जवळ ठेवुन उपनगर, नाशिकरोड परिसरात लोकांना धमकावून मारहाण करणे, लुटमार करणे, हप्ते गोळा करण्याचे तसेच टोळीतील सदस्यांना पैसे पुरविणे, खुनाचा प्रयत्न व खून करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे असे उद्याेग सुरु केले हाेते. उपनगर पोलिसांनी दाखल दराेड्याच्या गुन्ह्याच्या तपासात, संशयित सातत्याने संघटीत होऊन परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटीत गुन्हेगारी टोळी करून गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल वरिष्ठ पाेलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी पाठविला हाेता. टोळीतील सदस्यांविरूध्द एकूण 46 गुन्हे दाखल आहेत. माेक्काच्या गुन्हयाचा तपास सहायक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.
संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड -
दीपक पांडे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी व खून दरोडा, बलात्कार, खंडणी वसुली तसेच लँड माफियामध्ये सक्रिय असणाऱ्या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी मोक्का कारवायांच्या सहा ठोस कारवाई केल्या आहेत. त्यामुळे सामान्य व गोरगरिब नागरीक समाधान व्यक्त करत आहेत.