नाशिक - महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशकात मनसे ऍक्टिव्ह झाली आहे. यंदाच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर राहणार असून खुद्द राज ठाकरे यांनी आपले लक्ष नाशिकवर केंद्रीत केले आहे. काही काळ पडद्यामागे असलेली मनसे आणि मनसेला सोडून गेलेले पदाधिकारी अशा परिस्थितीत राज ठाकरे यांचे इंजिन धावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकसह राज्यातील 18 महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणूका फेब्रुवारी 2022 मध्ये होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. जुलै 2021 पासून राज ठाकरे यांनी नाशकात लक्ष केंद्रीत केले आहे. पुन्हा नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशात अमित ठाकरेंनी दौरे वाढविले आहेत. तसेच मनसेने नवीन शाखाध्यक्ष निवडीचा निर्णय घेत निवडीची प्रक्रिया पार पाडली. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नाशिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तिसरा नाशिक दौरा केला आहे.
'या' भागावर असणार मनसेची नजर
एकेकाळी नाशिक शहराच्या सिडको, अंबड परिसरातुन मनसेला घववावीत यश मिळाले होते. या भागातून नितीन भोसले आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र सध्या सिडको व अंबड हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यातून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना मागील दोन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत सातत्याने सर्वाधिक मते मिळाली आहेत. सध्या नाशिक पश्चिममध्ये शिवसेना- भाजपा युतीचे विधानसभा उमेदवार सीमा हिरे या दुसऱ्यांदा आमदार झाल्यात. याच परिसरात सर्वाधिक नगरसेवक सध्या शिवसेनेचे आहे. शिवसेनेचे 15, भाजपाचे 8 व राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे. तर काँग्रेस व माकप आणि मनसेला मात्र एक नगरसेवक देखील निवडून आणता आले नाही. याच भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी मागच्या निवडणूकीत मनसेकडून निवडणूक लढवली. मात्र त्यांना अपयश आले. आता मनसे पुन्हा या भागात ऍक्टिव्ह झाली असून दिलीप दातीर यांच्या संपर्क कार्यलयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले आहे.
मनसेत अंतर्गत वाद!
नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद असून, ज्येष्ठ नेत्यांकडून युवा नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप आहे. याबाबत युवा नेत्यांनी थेट राज ठाकरेंकडे तक्रारी केल्या होत्या. तेव्हा राज यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. आता महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन काही जणांकडे नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. जर जुने पदाधिकारी आणि नवीन टीम एकत्र कामे केले तर नाशिकमध्ये नवनिर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
हेही वाचा - किरीट सोमैय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावे; कोणीही त्यांना विरोध करू नये - हसन मुश्रीफ