नाशिक - आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा केला. तर मंगळवारी राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे आणि पक्षाचे सरचिटणीस संदिप देशपांडे आणि अमेय खोपकर नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी संदिप देशपांडे यांनी आगामी महापालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महापालिकेमध्ये मागील पाच वर्षात भ्रमनिरास झाला....
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मनसेचे युवा नेते अमित ठाकरे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे नाशिक दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाशिक महापालिकेकडून मागील पाच वर्षात जनतेचा भ्रमनिरास झाला, त्यामुळे आता नाशिक महापालिकेमध्ये दत्तक घेतलेल्या बापाला आम्ही त्यांची जागा कशी दाखवायची, याचे नियोजन करत आहोत, असा टोला देशपांडे यांनी भाजपला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे वक्तव्य केले होते, त्यावरून देशपांडे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या नद्यांवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. पण हा म्हणजे निव्वळ काही मातब्बर राजकारण्यांचा पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ निष्क्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्याने कोणतेही नियोजन आणि व्हिजन नाही, असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत करण्याआधी केली जाहिरातबाजी -
दरम्यान कोणाकडूनही युतीचा प्रस्ताव आला नसल्याचे यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केले असून नाशिक मध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम करून आम्ही नक्कीच विजय मिळवू, असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. तर शिवसेनेने महापूरग्रस्तांना मदत करण्याआधी जाहिरातबाजी केली आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे. हे चुकीचे असल्याची टीका देखील देशपांडे यांनी केली. कोकणामध्ये कोणताही नियोजन आराखडा तयार नसल्यामुळे प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मतदारसंघांचा आढावा घेणार..
अमित ठाकरे यांनी गेल्याच आठवडयात नाशिकमध्ये येत पदाधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले. आता पुन्हा अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून या दोन दिवसात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आहेत. राजगड या मनसेच्या कार्यालयात या मुलाखती होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती होणार असून त्यात मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच संभाव्य उमेदवारही हेरण्यात येणार आहेत.