नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे शहरात कुठे फिरताना दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यातच स्वतः महापौर सतीश कुलकर्णी हे तंदुरुस्त नसल्याचे सांगत मनसेने महापौरांना अनोखी भेट देऊन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला आहे.
नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजप पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू असल्याचे् सध्या पाहायला मिळत आहे. सोमवारी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी पतंजली काढा पिण्याचा सल्ला दिला. मंगळवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना थेट च्यवनप्राश भेट केले. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर बाहेर फिरतच नाहीत. त्यामुळे अगोदर त्यांनी च्यवनप्राश घेऊन स्वतः तंदुरुस्त बनावे आणि नंतर नागरिकांची काळजी घ्यावी, असा अनोखा सल्ला देखील महापौरांना मनसेकडून देण्यात आला आहे.