नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृहातील गर्दीत पाकीटमारीचा प्रयत्न करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आहे.
सतर्क कार्यकर्त्यांनी हाणून पाडला चोरट्याचा डाव -
राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृहातील गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकीटमाराला मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आहे. आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये राज ठाकरे यांच्या कक्षाबाहेर एका व्यक्तीचे पाकीट चोरी करण्याचा प्रयत्न चोराने केला. मात्र, काही कार्यकर्त्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाकीटमाराचा हा डाव हाणून पाडला आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने पाकीटमाराने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या पाकीटमाराला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्यावेळी अनेकवेळा पाकीटमारांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. मागील वेळी देखील एका पाकीटमाराला जागरूक कार्यकर्त्यांनी पकडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तर सर्व कार्यकर्त्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन देखील यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.