नाशिक - नववीच्या ऑनलाइन परीक्षेत कमी गुण का मिळाले, याबाबत आईने विचारणा केल्याने एक विद्यार्थी घरातून पळून गेला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या उपनगर भागात घडली आहे. याबाबत उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाचा शोध सुरू आहे.
सध्या कोरोनामुळे पारंपरिक पद्धतीने शाळा सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. ऑनलाइन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नववीत शिकणारा एक विद्यार्थी चक्क घरातूनच पळून गेला आहे. लॉकडाऊन काळात सर्वच इयत्तेचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. तसेच परीक्षा देखील ऑनलाइन घेण्यात येत आहेत. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला नुकत्याच झालेल्या शाळेच्या ऑनलाइन परीक्षेत कमी गुण मिळाले होते. दरम्यान याबाबत त्याच्या आईने त्याला कमी गुण का मिळाले, असा जाब विचारला. मात्र, परीक्षेत कमी गुण पडल्याने आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून हा विद्यार्थी घरातून पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बेपत्ता मुलाचा शोध सुरू असल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले आहे.
ऑनलाइन अभ्यास समजत नसल्याची तक्रार -
ऑनलाइन अभ्यास समजत नाही, अशी तक्रार या विद्यार्थ्याने यापूर्वी देखील घरच्यांकडे केली असल्याचे समजते आहे. त्यामुळे नैराश्यातून हा मुलगा आपल्या घरातून निघून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रातील सातारा आणि अमरावती जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याच्या नैराश्येतून दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा - ऑनलाइन शिक्षणाचे पितळ उघडे ; 23 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स नाही!