नाशिक - मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी गंभीर आहे. मागच्या सरकारने दिलेले वकील व आम्ही दिलेले नवीन वकील एकत्रितपणे न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाबाबत राजकीय स्वार्थासाठी कोणी कोल्हेकुई करू नये, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना लगावला आहे.
हेही वाचा - पोलीस मुख्यालयाच्या आवारातच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हाणामारी
मंत्री जयंत पाटील हे नाशिक येथे जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वळण बंधारे कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले आहेत. राज्यातील जास्ती जास्त वाहून जाणारे पाणी अडवले जाईल. वळणयोजनेद्वारे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवण्यात येईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान संदर्भात लवकरचं चर्चा करू, कामगार व मजूर यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. टाळेबंदीमुळे काही प्रश्न गंभीर झाले. त्यामुळे यापुढे टाळेबंदी नसून, नागरिकांनीच पुढाकार घेवून कोरोनाला अटकाव केला पाहिजे, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची बैठक घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील पश्चिमेकडे वाहून जात असलेले पाणी वळण योजना प्रकल्प पूर्ण करून जनतेच्या उपयोगात आणण्याचे निर्देश संबंधीत विभागाला दिले होते. त्यानंतर आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील जास्तीत जास्त पाणी मराठवाड्याला पोहचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांना आणखी गती देणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.