नाशिक - शिंपी बांधव सध्या आर्थिक दृष्ट्या अतिशय बिकट परिस्थितीत असून बांधवांना प्रगतीसाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मात्र सध्या ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) गदा येत असून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत सर्व शिंपी बांधव काळी फीत बांधून निषेध नोंदविणार, असा निर्णय 'ओबीसी आरक्षण पे चर्चा' मोहिमेअंर्तगत घेण्यात आला. नाशिक शहरातील तूपसाखरे लॉन्स येथे पार पडलेल्या शिंपी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
'...तर लढा देत राहू'
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने हे आरक्षण पूर्ववत करण्यासोबतच ओबीसी जनगणना तसेच इतर न्याय मुद्द्यांवर ओबीसी बांधवामध्ये जनजागृती करण्यासाठी ओबीसी आरक्षण पे चर्चा मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आज (रविवारी) नाशिक शहरातील तूपसाखरे लॉन्स येथे बैठक पार पडली. जोपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत या लढाईत शिंपी समाज बांधव सक्रियपणे सहभागी होऊन लढा देतील. प्रसंगी आंदोलने, निदर्शने जे काही अखिल भारतीय समता परिषद करेल, त्याठिकाणी शिंपी समाज अग्रभागी सहभागी होईल. तसेच काम करत असतांना सर्व शिंपी बांधव काळ्या फिती लावून काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
'अर्थसंकल्पात ओबीसींची आर्थिक तरतूद करावी'
मागास राहिलेल्या समाजाचा प्रतिनिधी होऊन त्याला न्याय हक्क मांडण्यासाठी राजकीय आरक्षण देण्यात आले आहे. मात्र आता आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, यासाठी लढा उभारावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ओबीसी जनगणना करण्यात यावी. देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात यावी. ओबीसींना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात इतर समाजाला देखील या दडपशाहीला सामोरे जावे लागेल, असे शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.