नाशिक - जिल्ह्यातील बहुचर्चित बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत वाघ यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम युवक आघाडीच्यावतीने उपोषण देखील करण्यात आले.
प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यासाठी देवळ्यात उपोषण -
नाशिक जिल्ह्यात तेलगी घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा मुद्रांक घोटाळ्याने नाशिक राज्यभरात चर्चेत आले आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडीलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करण्यासाठी केलेल्या भास्कर निकम यांना आपली जमीन परस्पर विकली गेल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. एकाच क्रमांकाच्या दोन स्टॅम्पवर ही जमीन विक्री करण्यात आल्याने भास्कर निकम यांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यात वेंडर, दुय्यम निबंधक कार्यालय आणि फेरफार नोंद करणाऱ्या तलाठी कार्यालय या ठिकाणी नियमित वावर असलेल्या चंद्रकांत वाघ या स्टॅप वेंडरने हा प्रताप केल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी यातील मुख्य आरोपी चंद्रकांत वाघ याला देवळा पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याचा परवाना रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने देवळा शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.
मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई -
मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणात दुय्यम निबंधकांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. आता या घोटाळ्यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते त्यामुळे, या प्रकरणाची प्रशासन देखील कसून चौकशी करत आहे. तेलगी पाठोपाठ बनावट मुद्रांक घोटाळा समोर आल्याने सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी अधिकाऱ्यांची नाव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने तपासात आणखी काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.