नाशिक - जमिनीच्या वाढत्या भावामुळे भूमाफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या टोळ्यांकडून जमीन मालकांवर साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा भूमाफियांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यानी सांगितले आहे.
मृताच्या नातेवाईकांना न्याय दिला जाईल
नाशिकच्या आनंदवली भागामध्ये रमेश मंडलिक या सेवानिवृत्त एसटी कंडक्टरची 17 फेब्रुवारीला अज्ञातांनी निर्घूण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या हत्या प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणाचे भूमाफिया कनेक्शन उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक कुमार पांड्ये यांनी दिली आहे. गंगापूर रोडवर मंडलिक खून प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ संशयितांना अटक केली असून, तपासाअंती या हत्या प्रकरणात भूमाफिया कनेक्शन उघडकीस आले. यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करण्यात येईल तसेच या माफियांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई केली जाईल आणि मृताच्या नातेवाईकांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त दीपक कुमार पांड्ये यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे..
नऊ संशयित पोलिसांच्या ताब्यात, दोघे अद्यापही फरार
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत संशयित सचिन मंडलिक, जगदीश मंडलिक, अक्षय मंडलिक, मुक्ता मोटकरी, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबाजी भडांगे, भगवान चांगले, रम्मी राजपूत या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील रम्मी राजपूत आणि जगदीश मंडलिक हे मुख्य संशयित अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेती प्लॉट आणि जमीन खरेदी विक्री करणारी टोळी शहरात कार्यान्वियत असल्याचा या आधी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये उघडकीस आले.
दरम्यान, या हत्याप्रकरणात पुन्हा एकदा भूमाफिया कनेक्शन उघडकीस आल्याने आता शहराचे पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेत आता थेट भूखंड माफियांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.