नाशिक - शहरातील यशवंत व्यायाम शाळेमध्ये १५ जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त मल्लखांब खेळाचे महत्त्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावे या हेतूने खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केले.
महाराष्ट्रात मल्लखांब संघटनेने पुढाकार घेऊन १५ जून हा दिवस संपूर्ण भारतात आणि अनेक देशातही जागतिक मल्लखांब दिवस म्हणून साजरा करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या कार्यासाठी भारतीय मल्लखांब संघटना आणि देशाबाहेरील संस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे भारतामध्ये ज्या ठिकाणी मल्लखांब हा खेळ शिकवला जातो, अशा ठिकाणी दिवसभर मल्लखांब विषयी कार्यक्रमाचे आयोजन करून या खेळाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मल्लखांब संघटनांना आणि भारतीय मल्लखांब संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये यशवंत व्यायाम शाळेमध्ये मल्लखांब दिनानिमित्त मल्लखांब प्रात्यक्षिक तसेच खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत व्यायाम शाळेत मल्लखांब फार वर्षांपूर्वीपासून शिकवला जातो. आजच्या दिवसानिमित्त यशवंत व्यायाम शाळेतील मल्लखांबावर खेळाडूंनी नवीन आणि जुन्या मल्लखांबपटूंनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमात उत्साह आणला. यात ४ वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंतच्या सर्व आजी-माजी मल्लखांब खेळाडूंनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमा प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी एस नाईक, नाशिकमधील मल्लखांब प्रशिक्षक बाळासाहेब घाडगे, गुलालवाडी व्यायामशाळा दांडेकर दीक्षित, मोहन मास्तर तालीम येथील खेळाडू, तसेच दीपक पाटील, रमेश वाजे, विनायक पाठक, दत्तात्रय शिरसाठ, यशवंत जाधव, उत्तरा खानापुरे आणि तेजस्विनी सोनपटकी आदी उपस्थित होते.