नाशिक - कोरोना काळात नाशिक महानगरपालिकेच्या हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमधील भोजन पुरवठ्याबाबत चौकशी व्हावी आणि मगच बिल अदा करावे, अशी मागणी भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा - नाशकात लाॅकडाऊन शिथिल; ७ ते २ वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरू
नाशिक शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता, अशात नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेल्या हॉस्पिटलमध्ये आणि कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत भोजन देण्यात येत होते. मात्र, अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी ते जेवण न खाता हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना डब्बा दिला असताना ठेकेदाराकडून अतिरिक्त डब्ब्यांचे बिल सादर करण्यात येऊन लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी केला आहे. डब्ब्यांच्या संख्येबाबत महानगरपालिकेने चौकशी करून बिलाचे पैसे द्यावे, अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.
लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न
नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेले बिटको हॉस्पिटल, मेरी कोविड सेंटर, समाजकल्याण कोविड सेंटर, संभाजी महाराज कोविड सेंटर या ठिकाणी असलेल्या रुग्णांना महानगरपालिकेकडून मोफत जेवण देण्यात आले आणि याचाच फायदा घेत भोजन ठेकेदाराने अतिरिक्त डब्बे दाखवून लाखो रुपयांच्या बिलाची मागणी केली. वास्तविक पाहता हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना नातेवाईकांनी डब्बे दिल्याचे टास्क फोर्स कमिटीच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे, मग हे डब्बे नेमके कोणी खाल्ले या बाबत चौकशी होणे गरजेचे असून प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्तीला घरी जाऊन त्याने खरच मोफत दिले जाणारे डब्बे खाल्ले का? याची देखील माहिती महानगरपालिकेने घेऊन नंतरच बिल अदा करावे असे मत भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - नाशिक : मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन