नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच बर्ड फ्लू न डोकं वर काढल आहे. सटाणा तालुक्यातील वाठोडा गावात घरगुती पाळीव कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटरचा परिसर सील केला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वाठोडा गावांमध्ये अचानकपणे घरगुती पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, मयत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून या क्षेत्रापासून जवळपास एक किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सर्वत्र पसरले भीतीचे वातावरण-
नाशिक जिल्हा हा कोंबड्यांच्या उत्पादनात देशातील अव्वल जिल्ह्यांपैकी एक आहे. राज्यामध्ये महिन्याकाठी सुमारे चार ते पाच कोटी कोंबड्यांचे उत्पादन घेतले जाते. यात निम्म्याहून अधिक उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जात असून एका दिवसाला चौदा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पोल्ट्री उद्योगात एकट्या नाशिक जिल्ह्याची सरासरी उलाढाल ही सात ते आठ कोटी रुपयांची आहे. यातच आता जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू ने शिरकाव केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पोल्ट्री व्यवसायिकांना केल आहे.
90 दिवसांसाठी कोंबडीचे मांस खरेदी विक्रीवर बंदी-
तसेच बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्या त्यांच्याशी निगडित खाद्य तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. वाठोडा गावासह आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातील सर्वच पोल्ट्री फार्म चे निर्जंतुकीकरण देखील करण्यात येणार आहे. तसेच बाधित आढळून आलेल्या जागेपासून जवळपास दहा किलोमीटर परिक्षेत्रामध्ये पुढील 90 दिवसांसाठी कोंबडीचे मांस खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा- यवतमाळच्या मातीत बनले महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शिल्प