नाशिक - पेट्रोल, डिझेल, गॅस, किराणा थोडक्यात इंधन दरवाढ (Fuel price hike) यासोबतच भाजीपाल्याचे दर वाढल्याने आता लग्न सोहळ्यातील पंगतीसाठी 30 टक्के जादा पैसे मोजावा लागणार आहेत. वाढत्या महागाई(inflation)मुळे नाशिक केटरिंग असोसिएशन(nashik caterers)ने हा निर्णय घेतला आहे.
महागाईचा फटका
लग्न सोहळा म्हटले, की जेवणाचा कार्यक्रम आलाच. आपल्या मुलाच्या, मुलीच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सातत्याने होणाऱ्या महागाईचा फटका आता लग्नसोहळ्यांनाही बसणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, किराणा याबरोबरच भाजीपाल्याचे दर वाढल्याने लग्न सोहळ्यातील जेवणदेखील तीस टक्के वाढवणार असल्याचे नाशिक केटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
बुकिंगमध्ये 25 ते 30 वाढ
तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडणार आहेत. मात्र अनेकांनी आधीच लग्न सोहळ्याच्या तारखा निश्चित केल्या असून कार्यालये, बँड, गुरुजी, कपडे खरेदी केले आहेत. तर अनेकांनी दोन-तीन महिन्यापूर्वी जेवणासाठीचा मेन्यूदेखील फिक्स केला आहे. त्यामुळे तेव्हाच्या दरानुसार बुकिंग घेतल्याने तोच दर ग्राहकांना दिला जाणार असून यापुढे होणाऱ्या बुकिंगमध्ये 25 ते 30 वाढ होणार असल्याचे केटरिंग व्यवसायिकांनी सांगितले.
...म्हणून 30 टक्के वाढ होणार
कोरोनाचे निर्बंध (Corona) शिथिल झाल्याने तब्बल दोन वर्षांनंतर केटरिंग व्यवसाय पुन्हा उभारी घेत आहे. मात्र मागील वर्षभरापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आमच्या व्यवसायाला लागणाऱ्या स्टीलच्या भांड्याच्या किंमती वाढल्यामुळे खर्च वाढला आहे. पेट्रोल, डिझेल वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. कमर्शियल गॅसच्या किंमती 1400वरून 2200 रुपयांवर गेल्या आहेत. कारागीरांचा रोज 300वरून 450 रुपयांवर गेला आहे. किराणामध्ये लागणाऱ्या डाळी, तेल यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ होत असल्याने जुन्या दराने जेवण देणे आता शक्य होत नसल्याने आम्ही आमच्या मेन्यूकार्डमध्ये 25 ते 30 टक्के वाढ करणार असल्याचे, केटरिंग व्यावसायिकांनी सांगितले.