नाशिक - नाशिक व पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात तीन दिवस सलग तपासणी करण्यात घेऊन या कारवाईत सुमारे 26 कोटी रुपयांची रोख रक्कम व तसेच शंभर कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली असल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर दोन ते तीन वेळा आयकर विभागाचे छापे पडत असतात. मात्र ,यंदा चार दिवस सलग नाशिकमधील तीन ते चार व पिंपळगावच्या सात ते आठ व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. याकारवाईत आयकर विभागाचे दीडशे ते दोनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस व्यापाऱ्यांच्या कार्यालय,गोडाऊन,निवासस्थानी तसेच त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली. या कारवाईत आयकर विभागाला अनेक महत्वाची माहिती हाती लागली असल्याचं सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षातील आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र, या धाडसत्राने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
19 तास लागले रोकड मोजायला -
आयकर विभागाच्या पथकाने जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी 80 ते 90 अधिकारी-कर्मचारी नाशिक व पिंपळगाव मधील काही बँकांमध्ये तब्बल 18 ते 19 तास 26 कोटींची रक्कम मोजत होते. यात 500,100, 2000 च्या नोटा सर्वाधिक होत्या. महिन्याभरात तब्बल 32 कोटींची रक्कम नाशिक आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जप्त केली आहे.
आयकर विभागाची खेळी?
पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर जवळपास साडेचार हजार पर्यंत जाऊन पोहचले आहे. शिवाय दिवाळीत कांदा दर वाढणार असल्याचा अंदाज आहे. कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी व भाव पाडण्यासाठी आयकर विभागाकडून छापेमारीची ही खेळी खेळली जात असल्याचं एका कांदा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.