नाशिक - उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. आरोपी संमोहन तज्ज्ञ असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीकडे एक महिला उपचारासाठी गेली असता त्याने विनयभंग केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल करून अटक
स्वभाव चिडचिडा होत असल्याने उपचार करण्यासाठी संमोहन तज्ज्ञाकडे गेलेल्या महिलेचा संमाेहन तज्ज्ञानेच विनयभंग केल्याचा प्रकार पंचवटीतील पाथरवट लेन भागात समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दीपक विजयकुमार मुठाळ (वय ४८, रा. प्रतापसिंग चौक, पाथरवट लेन, पंचवटी) असे अटक केलेल्या संमोहन तज्ज्ञाचे नाव आहे.
उपचारासाठी गेल्यानंतर केले कृत्य
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती गेल्या काही दिवसांपासून स्वभाव चिडचिडा होत असल्याने यावर उपचारासाठी तिने मुठाळकडे जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास महिला नागचौक परिसरातील संशयिताच्या समोहन केंद्रात गेली असता संशयिताने तिच्याशी अश्लील वर्तन केले असल्याची तक्रार पंचवटी पोलीस स्टेशन येथे महिलेने केली आहे. याप्रकरणी अधिकचा तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करत आहेत.