नाशिक - हॉटेल, रेस्टॉरंट यांची वेळ वाढवून द्या, या मागणीसाठी नाशिकमधील व्यावसायिक आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. गोविंदनगर रिंग रोडवरील टीडीआर फूड कोर्टमध्ये आज रेस्टॉरंट चालकांनी काळे कपड़े घालून हातात निषेधाचे फलक घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
नाशिकचे रेस्टॉरंट दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्या, यासाठी महाराष्ट्र रेस्टॉरंट चालकांनी गोविंदनगर रिंगरोड येथे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देखील पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र
रात्री 10 पर्यँत वेळ वाढवून द्या - हॉटेल व्यावसायिकांची मागणी
मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एक वर्ष रेस्टॉरंट पूर्णपणे बंद होती. त्यानंतर रेस्टॉरंट ही चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आणि पुढे नऊ वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली. सोमवार ते शुक्रवार मॉल उघडण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यामध्ये रेस्टॉरंटला कुठलीही नवीन सवलत दिली नाही. रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी बुधवारी नाशिकमध्ये महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात काळे कपड़े घालून हातात निषेधाचे फलक घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत हॉटेल व्यावसायाला दिलेली परवानगी मान्य नाही -
गेले 4 महिने कुठलीही आवक नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणार्या बहुतांश उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने स्विकारायला हवी. तसेच रेस्टॉरंट क्षेत्रास स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यँत हॉटेल व्यावसायाला दिलेली परवानगी हॉटेल चालकांना मान्य नाही.
रेस्टॉरंट व्यवसायास दुजाभाव न करता रात्री 10 वाजेपर्यंत आसन व्यवस्थेसह परवानगी मिळावी. या प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. मुळात रेस्टॉरंट व्यवसाय चालविण्यासाठी सायंकाळचीच वेळ योग्य असते, अशातच दुपारी 4 नंतर बैठक व्यवस्थेवर निर्बंध लादून सरकारने रेस्टॉरंट व्यवसायाशी निगडीत सर्वच व्यावसायिकांचा पोटमारा करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे स्पष्ट जाणवते, असे मत सर्वच रेस्टॉरंट व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट