नाशिक - शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बिलाच्या वादातून एका कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलने तब्बल 12 तासांहून अधिक काळ डांबून ठेवल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी मध्यस्थीची केल्यानंतर 15 तासांनी मृतदेह नातेवाइकांना सोपवण्यात आला.
कॉलेज रोड भागातील व्हिजन हॉस्पिटलमध्ये 14 मे रोजी कोरोनाबाधित रुग्ण दत्तात्रय आटवणे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होत अखेर 22 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र या आठ दिवसात हॉस्पिटलने रुग्णांवर योग्य उपचार केले नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आणि अतिरिक्त बिल लावल्याने बिल कमी करून मिळावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या मागणीला दाद न देता आधी बिल भरा तरच मृतदेह मिळेल, अशी भूमिका घेतल्याने वाद आणखीनच पेटला. यावेळी हॉस्पिटल विरोधात नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे, रोहन देशपांडे, मुकुंद दीक्षित यांनी हॉस्पिटल बाहेर आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर तब्बल 15 तासांनी मृतदेह ताब्यात देण्यात आला.
अतिरिक्त बिलाची मागणी -
माझ्या वडिलांना दाखल करण्यापूर्वी हॉस्पिटलने एक लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली. मात्र, एकावेळी एवढे पैसे नसल्याने माझ्या बहिणीने सुरवातीला 30 हजार हॉस्पिटलमध्ये आणि 60 हजार मेडिकलमध्ये डिपॉझिट केले. तसेच हॉस्पिटलने वेळोवेळी आमच्याकडे पैशाची मागणी केली. या बाबत आम्ही त्यांच्याकडे बिलाची मागणी केली. मात्र त्यांनी टाळाटाळ करत नंतर देऊ असे सागितले. उपचारादरम्यान 21 तारखेला रात्री वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे 1 लाख 20 हजार हॉस्पिटल बिल आणि 2 लाख मेडिकल बिलांची मागणी केली. त्यांनी शासन नियमाचे कुठलेच बिल लावले नाही. तसेच बिल पूर्ण भरा असे सांगत गेल्या 15 तासांपासून मृतदेह त्यांनी डांबून ठेवला असा आरोप मृत व्यक्तिचा मुलगा स्वप्नील आटवणे यांनी केला आहे.
मृतदेह 15 तास का डांबून ठेवला -
हॉस्पिटल बिलाच्या कारणावरून 15 तास हॉस्पिटलमध्ये मृतदेह कसे डांबून ठेऊ शकतात? हॉस्पिटलमध्ये शवगृह नसतांना आयसीयू मध्ये कोविड रुग्णांचा मृतदेह 15 तास कसा ठेऊ शकता? महानगरपालिकेचे बिल ऑडिट करणारे पथक संवेदनशील दाखवत बिलाची तापसणी का करत नाहीत, असे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे यांनी उपस्थित केले आहे.