नाशिक - सिडको भागात दुकानदारावर मास्क बाबत कारवाई न करता थेट दुकानातील फर्निचरच महापालिका कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याने दुकानदाराने पोलिसात धाव घेतली आहे. मनपा कर्मचारी दिवसाढवळ्या लूट करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दुकानदाराने केली आहे.
नाशिकमध्ये कोरोना कारवाईच्या आडून मनपा कर्मच्याऱ्यांचा व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे, कोरोना बाबत नियम न पाळणाऱ्यांवर मनपा कडून दंडात्मक कार्यवाई केली जात आहे, मात्र मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम न पाळल्याची कारवाई सोडून सिडकोच्या एका दुकानातील फर्निचरच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याचं समोर आले आहे. त्यामुळे फर्निचर दुकानदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत मनपा कर्मचाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फर्निचर उचलून नेतांनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महापालिकेकडून अशा प्रकारे करण्यात आलेल्या कारवाईचा व्यापारी वर्गातून निषेध होत आहे.
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे मागील वर्षभरापासून आम्ही सर्व व्यापारी त्रस्त आहोत. त्यात आता महानगरपालिका कर्मचारी आमची लूट करत आहेत. माझे सिडको भागातील डिजीपीनगरमध्ये फर्निचरचे दुकान आहे. मी दुकानात असताना अचानक महानगरपालिकेचे कर्मचारी दुकानात आले आणि मास्क का लावला नाही, असे विचारून त्यांनी माझ्या दुकानातले फर्निचर उचलून गाडीत टाकून घेऊन गेले. मी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी ऐकली नाही. मनपा कर्मचारी कोरोनाच्या नियमांच्या नावाखाली दिवसाढवळ्या लूट करत असून याबाबत आता मी पोलिसात आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचे दुकानदार अजय यादव यांनी सांगितलं आहे.