नाशिक - नाशिकच्या दसक परिसरात असलेल्या सीएनजी पंपावरती गॅस गळती झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गॅसगळती रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुख्य कॉक केला बंद
नाशिकच्या दसक परिसरामध्ये असलेल्या एका पेट्रोलपंपावर सीएनजी गॅस गळती झाल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सकाळचा सुमारास घडला. सकाळी दहाच्या दरम्यान या ठिकाणी अचानकपणे गॅस गळती होऊ लागल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने पावले उचलत पाइपलाइनचा मुख्य कॉक बंद केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही संपूर्ण गॅस गळतीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भीतीचे वातावरण
या ठिकाणी गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास येताच पेट्रोलपंपावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सीएनजी गॅसगळती थांबवल्यास या ठिकाणचा अनर्थ टळला. सकाळच्या सुमारास अचानक एका जागेचा पाइप तुटून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होण्यास सुरुवात झाली होती. तत्काळ या लाइनचे काम केले गेले, मात्र पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र या ठिकाणी बघायला मिळाले, तर अचानक गॅसगळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.