नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. यंदाच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याचे स्पष्ट जाणवते. आज गणेश विसर्जनाच्या दिवशीही भाविकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत घरगुती बाप्पाला निरोप दिला.
यंदा नाशिकमध्ये भविकांनी पर्यवरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना पसंती दिल्याचे चित्र आहे. नाशिक महानगरपालिकेने शहरातील 36 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. याला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच अनेक सामाजिक संस्थानी देखील ठिकठिकाणी स्टॉल थाटून मूर्ती दान करण्याचे आवाहन केले. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. प्रदुषण रोखण्यासाठी मागील वर्षी 2 लाखांहून अधिक भविकांनी गणेशमूर्ती दान केल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा पहिल्यांदाच सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक निघणार नाही. मोठे देखावे, विसर्जन मिरवणुका, ढोल-ताशांची पथके यांवर मर्यादा आल्या आहेत.