नाशिक - केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प माडला. या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना मांडल्या गेल्या आहेत. या वर नाशिकच्या शेतकऱ्यांनी आम्हाला भीक नको शेतीमालाला हमी भाव द्या, अशी मागणी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रिमंडळात आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला, या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवत सरकारने कृषी क्षेत्रासाठी 16 सूत्री योजना आणल्या आहेत. यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जाची तरतूद, गावस्तरावर गोदामाची निर्मीती, जिल्हास्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन,सेंद्रिय शेतीवर भर, महिला बचत गटांना प्रोत्साहन, शेतकरी विमा योजना, दूध आणि मासे यांच्या वाहतुकीसाठी किसान रेल योजना, ग्राम भांडार योजना, नापीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प योजना, अशा योजनांचा पाऊस सरकारने पाडला. मात्र, तरी देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मागील योजनाच सरकार राबवत असून यात नवीन काही नसून मागील पंतप्रधान किसान योजनेचा लाभ फक्त 10 टक्के शेतकऱ्यांना मिळला असून 90 टक्के शेतकरी या पासून वंचित असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा, द्राक्ष, डाळिंब लागवड करणारा जिल्हा असून सरकारने योग्य आयात -निर्यात धोरणे राबवण्याची गरज असून शेतीपीकाला हमी भाव दिला तर इतर योजनांच्या भीकेची गरज पडणार नाही, अशी परखड प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्या आगोदर शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ असे म्हटले होते. मात्र 6 वर्षानंतर देखील त्यांनी त्यांची आश्वासने पूर्ण केली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.