नाशिक -गणेशोत्सव हिंदूंचा सण असला तरी हा सण सर्व धर्मियांना रोजगार उपलब्ध करून देणारा ठरत आहे. शहरात एक मुस्लिम तरुण गणेश मूर्तींना फेटे बांधून स्वत:चा रोजगार साधत आहे. या तरुणाकडून अनेक हिंदू लोक श्रद्धेने आपल्या बाप्पाला फेटे बांधून घेतात हे विशेष.
गणेश मूर्तीला मोठ्या श्रद्धेने फेटे बांधणाऱ्या या तरुणाचे नाव आहे गुलाब मेहमूद सय्यद. धर्माने मुस्लिम असला तरी तो व्यवसायिक आहे. म्हणूनच तो शहरातील गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉलवर गणेश मूर्तींना फेटे बांधून आपला व्यवसाय करतो. गणेश उत्सव हिंदू धर्मीयांचा सण म्हणून ओळखला जात असला, तरी हा उत्सव सर्व धर्मीयांना रोजगार उपलब्ध करून देणारा ठरतो हे निश्चीत. त्यामुळे सर्व धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींना पैठणीचे आणि जरीचे फेटे बांधण्याची नवी फॅशन आली आहे. हीच नवी फॅशन अनेकांना रोजगार देणारी ठरत आहे. यातच या मुस्लिम तरुणालाही रोजगार मिळाला आहे. मोठ्या आनंदाने आणि भक्ती भावाने हा तरुण गणपती बाप्पाच्या मूर्तीला फेटे बांधत आहे. दरम्यान बाप्पांची ही सेवा भाविकांनाही आवडत असून ते या तरुणाकडून आपल्या बाप्पाला फेटा बांधून घेत आहेत.
गुलाब सय्यद या तरुणाप्रमाणे अनेक इतर धर्मीय बांधवांना या काळात रोजगार मिळतो. त्यामुळे हा उत्सव हिंदू धर्मियांसह सर्वच धर्मीयांसाठी प्रिय आहे. यामुळेच गणेशोत्सव सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावची भावना जागृत करणारा उत्सव ठरतो.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरया...मानाच्या पहिल्या गणपती श्री कसबा गणपतीचे पालखीतून आगमन