नाशिक - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगूल वाजला असून राज्यातील मुंबईसह १८ महापालिकांच्या निवडणुका वॉर्ड पद्धतीने होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा - शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा राडा, 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल
एकसदस्यीय पद्धतनुसार नविन वॉर्ड रचना
महानगरपालिका निवडणुकीसाठी कच्ची वॉर्ड रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने या १८ महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे, आता महानगरपालिका निवडणुकीसाठी एक सदस्य पद्धत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी एक आदेश प्रकाशित केला असून त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव यांसह राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, भिवंडी - निजामपूर, उल्हासनगर, पनवेल, मीरा - भाईंदर, पिंपरी - चिंचवड, पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, या महानगरपालिकांची मुदत २०२२ ला संपत आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २७ ऑगस्ट २०२१ पासून नवीन वॉर्ड रचना तयार करण्याचे काम सुरू करावयाचे आहे. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार प्रभाग पद्धतीची रचना झाली होती ती आता रद्द करण्यात आली असून, एकसदस्यीय पद्धतनुसार नवीन वॉर्ड रचना करावयाची आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशामध्ये हे काम पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशावर राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी स्वाक्षरी केलेली आहे, त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, ही निवडणूक एक सदस्य पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस