नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाशी संपर्क साधून, आम्ही सक्तवसुली संचालनालय (ईडी) मधून बोलत असल्याचे भासवून भामट्याने खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घर, जमीन, परीवाराबाबत सर्व माहिती विचारली
दिलीप शंकरराव थेटे (५६ वर्षे, रा. गिरणारे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.७) दुपारी अडीचच्या सुमारास एका भामट्याने थेटे यांना मोबाईलवर संपर्क केला. थेटे यांनी तो फोन उचलला नव्हता. त्यानंतर काही वेळाने थेटे यांनी स्वतःहून त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, भामट्याने त्याचे नाव एम.एस.अहलुवालिया असल्याचे सांगुन तो ईडीचा कमीशनर बोलत असल्याचे सांगितले. तसेच थेटे यांनी केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने चार फाईल आलेल्या असून, आता काही वेळातच तुमच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडुन गुन्हा दाखल होणार असल्याचे भामट्याने थेटे यांना सांगितले. हा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर, काही देवाण-घेवाण करून प्रकरण येथेच थांबवता येईल, असे भामट्याने सांगितले होते. थेटे यांनी थोडा वेळात संपर्क साधतो, असे सांगून पुन्हा काही वेळाने संपर्क केला. त्यावेळी भामट्याने थेटे यांच्याकडुन घर, जमिन, परीवाराबाबत सर्व माहीती विचारली. त्यानंतर थेटे यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही. त्यामुळे कोणीतरी मोबाईलवरून ईडी कारवाईची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची फिर्याद थेटे यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनच्या संशोधनात नागपुरातील माकडांनी दिले बहुमूल्य योगदान!