नाशिक - मुंबई येथे सुरू असलेल्या एका कारवाईचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याने ईडीचे पथक आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. या ईडीच्या पथकाने सिन्नर नागरी पतसंस्था कार्यालयाची चौकशी केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई येथील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने जिल्हा परिषद समोरील सिन्नर नागरी पतसंस्था कार्यालयात चौकशी केल्याचे समजते. तसेच या पथकाने पतसंस्थेतील काही दस्तावेज ताब्यात घेतल्याचेही समोर येत आहे. या पतसंस्थेवर सहकार विभागाने प्रशासनाची यापूर्वीच नियुक्ती केली आहे. मुंबई येथील एका प्रकरणातील अनेक बाबींचे धागेदोरे या पतसंस्थेशी निगडित असल्याचे बोलले जाते आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. असे असले तरी ईडीचे पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने मंगळवारी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसूली संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला. तसेच त्यांचे मोठे पुत्र विंहग सरनाईक यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात होते. त्यामुळे ईडीच्या कारवाईंची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा-विहंग सरनाईकबरोबर आ. प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होण्याची शक्यता
ईडीकडून अमित चंदोले यांना अटक-
'टॉप सिक्युरिटी' एजन्सीमध्ये महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमित चंदोले यांना १७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. ईडीमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले अमित चंदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालकपदीही अमित चंदोले आहेत.
हेही वाचा-विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार