नाशिक - नाशिकरांचे आणि मिसळचे एक अतूट नाते (Nashik And Misal Relation) आहेत. त्यामुळे मिसळची हॉटेल्स आणि त्यांची नावे ठेवण्यावरून चढाओढ असते. त्यातच ट्रेडमार्कचा विषय अलीकडे महत्त्वाचा वाटू लागला असून अनेकांवर ट्रेडमार्कची कारवाई होऊ लागली आहे. नुकतेच निखारा मिसळवरून (Nikhaara Misal) बौद्धिक संपदा विभागाने आदेश दिल्याने पाट्या बदलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी मिसळ हा विषय किती जिव्हाळ्याचा बनला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
'निखारा मिसळ'च्या बेकायदा नक्कलेला ट्रेडमार्क कायद्याची चपराक -
वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ बनवत जगभरातील खवय्यांना मिसळची भुरळ पाडणाऱ्या मिसळ कॅपिटल नाशिकमध्ये आता हॉटेलच्या नावावरून वाद होऊ लागले आहेत. २०१५ साली नाशिकमध्ये ओवारा ग्रुपने 'निखारा मिसळ' या नावाने एक नवीन मिसळ निर्माण केली. या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे मातीच्या भांड्यात निखाऱ्याचा स्मोक देत, ही मिसळ बनवली गेली. या मिसळ सोबत नागली आणि गव्हाचे पाव देण्याचा नवीन प्रयोगही निखारा मिसळ बनवताना ओवारा ग्रुपने केला. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांत या निखारा मिसळची चर्चा जगभरातील खवयांमध्ये झाली आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र, महात्मा नगर भागातील खऱ्या खुऱ्या ओवारा मिसळला लागून गावरान निखारा मिसळ असे साम्य असलेलं नाव देत एका हॉटेल व्यवसायिकाने नवे मिसळचे हॉटेल सुरू केले. मात्र, या हॉटेलमुळे ओवारा मिसळ खायला येणाऱ्या खवयांमध्ये संभ्रम होऊ लागला की निखारा मिसळ नेमकी अस्सल कोणती ही बाब निखारा मिसळचे मालक गिरीश पोद्दार आणी संचालक निलेश पाटील यांच्या लक्षात आली आणि त्या नंतर त्यांनी लागलीच भारत सरकारच्या ट्रेड मार्क रजिस्ट्रीकडे विनंती अर्ज करत ही बाब लक्षात आणून दिली आणि लागलीच या विभागाने व्यापार चिन्हे आधीनियम १९९९ नुसार
२२ नोव्हेंबर २०२१ रोजी 'गावरान निखारा मिसळ' हा मार्क कायमस्वरूपी रद्द व बाद करण्याचा आदेश दिला. 'गावरान निखारा मिसळ' या हॉटेलला अखेरीस आपले नाव बदलावे लागले आहे. यामुळे ग्राहकांचा होणारा संभ्रम व दिशाभूल आता थांबणार आहे.
'गावरान निखारा मिसळ' हा मार्क कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश -
निखारा मिसळ आता नाशिकच्या महात्मा नगर परिसरात सुरू असून ज्या गावरान निखारा मिसळने, निखारा मिसळचे नाव वापरले होते. त्या गावरान निखारा मिसळच्या मालकाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशने दणका दिल्यानंतर त्यांनी आता हे नाव बदललं आहे. गावरान कोळसा भट्टी मिसळ आणि मस्तानी मिसळ असे नवे नाव त्यांनी दिले आहे. पोद्दार यांनी भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडे केलेला विनंती अर्जानंतर ट्रेंड मार्क रजिस्ट्रीने व्यापार चिन्हे आधीनियम १९९९ नुसार 'गावरान निखारा मिसळ' हा मार्क कायमस्वरूपी रद्द व बाद करण्याचा आदेश दिले आहे. यामुळे या हॉटेल मालकाला त्याच्या हॉटेलचे नाव बदलणे भाग पडले आहे.
खरी निखारा मिसळ महात्मा नगर भागात -
एकूणच काय तर 'मिसळ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' म्हणून नव्याने ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नाशिकमध्ये आता मिसळच पेटंट आणि नाव चोरण्याहून वाद होऊ लागले आहेत. त्या हून नाशिककरांसाठी मिसळ किती जीव की प्राण आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेस आहे. मात्र, आता ओवारा ग्रुपची खरी खुरी निखारा मिसळ खायची असेल तर महात्मा नगर भागात ती सुरू असून खऱ्या खुऱ्या मिसळला नाशिकरांची पसंती देखील कायम आहे.
हेही वाचा - PM modi's account hacked: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा