नाशिक - कोरोनाचा परिमाण सर्वच क्षेत्रावर झाला आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नाशिक महानगरपालिकांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याच्या तयारीत आहे. या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती संगीता गायकवाड यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन देखील वाढवण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात याबाबत नियोजन केले जात असून नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याची तयारी केली आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महानगरपालिका शिक्षण सभापती संगीत गायकवाड यांनी पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
यात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावे, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वर्षभर पेस्ट कंट्रोल व्हावे, प्रत्येक वर्गासाठी सॅनिटायझर आणि स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची व्यवस्था व्हावी, महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत इंटरनेट सेवा व ई -लर्निंगसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांना मास्क देण्यासाठी हे मास्क बनवण्याचे काम अल्पबचत गटांना देण्यात यावे, अशा मागण्या आयुक्तांना करण्यात आल्या आहेत.