नाशिक - शहरात डेंग्युसह साथीच्या आजारांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यूचा तर उद्रेक झाला असून नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे विक्रमी 322 रुग्ण आढळून आले आहे. साथीच्या आजारांनी तर सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढत आहे. माघील काही वर्षांतील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी पाहता एकाच महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे.
नाशिकध्ये आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 11 महिन्यांत या आजाराने बाधित झालेल्यांची संख्या आता 871 वर पोहोचलीय. आतापर्यंतची डेंग्यूच्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. ही परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांकडून घरभेटी दिल्या जात असून ठेकेदाराची माणसे असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना नागरिकांकडून प्रवेश नाकारला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत प्रभावी जागृती होत नसल्याचा दावा आता विभागाकडूनच केला जात आहे.
साथीच्या आजारांचा आलेखही वाढता आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 207 रुग्ण, नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या 322 वर गेली. या महिनाभरात तब्बल 1097 जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याच समोर आले आहे. त्यात आणखी एक बाब म्हणजे काही रुग्णांचे रक्त नमुने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नोव्हेंबरच्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून ही गंभीर परस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
याकाळात काय काळजी घ्यावी -
- डेंग्यू तापात शक्यतो आराम करणे
- शरीरात पाण्याची कमी होऊ न देणे
- टप्याटप्याने पाणी पीत राहावे
- झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे
- दिवसभर पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे
- घरात किंवा परिसरात पाणी साठू देऊ नये
- कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये
- तापाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
- पाणी शक्यतो झाकून ठेवणे
- कुलर, फ्रीज वापरत असल्यास त्यातील पाणी बदलणे
- सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी तास दीडतास दरवाजा आणि खिडकी बंद ठेवावे