नाशिक - चीनसोबतच संपुर्ण जगाने आता कोरोनाचा धसका घेतला आहे. सावधानता म्हणून भारतानेही चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. मात्र, या बंदीचा फटका आता भारतीय सण समारंभ यांना देखील बसत आहे. नाशिकच्या बाजारपेठेतील विक्रेत्यांनाही याचा फटका बसल्याचे विक्रेते सांगत आहेत.
हेही वाचा... COVID-19 : गुरुग्राममध्ये आढळला आणखी एक रूग्ण..
रंगपंचमी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रंग उडवण्याची पिचकारी, वॉटर टॅंक आदी वस्तु चीनमधून आयात केल्या जातात. मात्र, कोरोनाच्या धर्तीवर यावर्षी चीनमधून होणारी आयात बंद आहे. त्यामुळे याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. काही व्यापाऱ्यांनी मात्र गेल्याच वर्षी आवश्यक तितका माल आयात केल्याने बाजारात काही प्रमाणात लहान मुलांना आकर्षक वाटणाऱ्या वेगवेगळ्या आकारातील पिचकाऱ्या, वॉटर टॅंक उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
चीनमधून येणाऱ्या पिचकाऱ्या, वॉटर टॅंक आदी वस्तु वेगवेगळ्या आकारात आणि आकर्षक असतात. त्यांची किंमत देखील भारतात तयार झालेल्या वस्तुंच्या किंमतीपेक्षा कमी असते. त्यामुळे ग्राहकांकडून चीनच्या वस्तुंना मोठी मागणी असते.
हेही वाचा... कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचे सर्व कार्यक्रम रद्द करा, मनसेची पालिकेकडे मागणी
भारतात दिल्ली, मुंबई, कर्नाटक आणि गुजरात येथे रंग, पिचकाऱ्या बनवण्याचा मोठा व्यवसाय आहेत. यावर्षी चीनमधून येणाऱ्या वस्तुसोबत रंगपंचमीसाठी लागणाऱ्या वस्तूंची आयात बंद झाल्याने भारतातील उद्योगाला संधी असल्याचेही विक्रेते सांगत आहेत.