नाशिक - उन्हाळ्याला सुरवात झाली की, सर्वांनाच ओढ लागते ती आंबा, काजू, करवंद, मोहाची फुल, कैरी, चिंच, रान आवळा यांसारख्या रानमेव्याची. मात्र, यावर्षी प्रथमच हा रानमेवा बाजारातून गायब होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचे कारण कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पेठ सुरगाणा येथील आदिवासी बांधवांना हा रानमेवा गोळा करायला जंगलात जाता येत नाही. पर्यायाने या रानमेव्याची विक्री करता येणार नसल्याने आदिवासी गरीब बांधवांच्या हक्काच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे सरकारने किमान शहरांतर्गत तरी रानमेवा विक्री करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी रानमेवा विक्रेत्यांनी केली आहे.
हेही वाचा.... लॉकडाऊन : विस्थापित कामगारांचे कुटुंब २२ दिवसांनी पोहोचले घरी; ६०० किलोमीटर केला पायी प्रवास..
ग्रामीण भागातून येणारे हे बांधव रानमेवा विकून मिळणाऱ्या थोड्याफार पैशातून कुटुंबाची रोजीरोटी भागवतात. मात्र, आता रोजच्या दिनचर्येत हातभार लावणाऱ्या त्यांच्या रोजगारावर कोरोनाच्या संकटामुळे पाणी फिरले आहे. सुरगाणा पेठ परिसरातील दऱ्याखोऱ्यात वास्तव करणारे आदिवासी बांधव जंगलात भटकंती करून हा रानमेवा शहरात विक्रीसाठी घेऊन येतात. उन्हाळ्यातच मिळणारा दुर्मिळ रानमेवा यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे विक्रीसाठी येऊ शकत नाही. त्यामुळे हा रानमेवा सध्या बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे.
शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने आणि इतर कोणतेही काम नसल्याने पेठ सुरगाणा या आदिवासी पाड्यावरील शेतकरी मार्च-एप्रिल दरम्यान पोटाची खळगी भरण्यासाठी दोन ते तीन महिन्यासाठी शहाराकडे स्थलांतरित होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गोरगरिबांना ना शहराकडे जाता येत आहे, ना स्थानिक परिसरातील रानमेवा विकता येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आली आहे.