नाशिक - नाशिकमधील भगूर येथे नगरपालिका टॉयलेट स्वच्छता नसल्यामुळे विषारी वायू तयार होऊन अचानक ब्लास्ट झाला. त्यामुळे त्यातील सर्व घाण ही बाहेर पडलीये. सध्या या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी सांगूनही स्वच्छता होत नाहीये, असा आरोप येथील नागरिकांकडून आता होऊ लागलाय.
विशेष म्हणजे या टॉयलेटच्या बाजूलाच लहान मुलांची शाळा आहे. पण सुट्टी असल्यामुळे हा अनर्थ टळला आहे. तसेच या भागात लोकांची नेहमीच वर्दळ रहाते. शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका आहे. यासाठी अनेक वेळा जागा बदलावी किंवा स्वच्छता ठेवावी अशा तक्रारी नागरिकांनी करूनही कधी नगरपालिका व सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली नाहीये. मात्र आता तत्काळ नगरपालिकेने दखल घ्यावी, अशी मागणी येथील स्थानिकांकडून होती आहे.
दरम्यान, राममंदीर रोडवरील टी झेड शाळेसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा टाकीचा अचानक स्फोट झाला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. शौचालयाच्या सेफ्टिक टँकमध्ये विषारी वायू साठून त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर शौचालयाचा काही भाग कोसळला आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस, प्रशासन व लोकप्रतिनिधी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.