नाशिक - देशातील पाच राज्यांमधील निवडणुका झाल्या की लगेच जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा (Petrol Diesel Rate Hike) शॉक बसला आहे. 22 मार्चपासून तब्बल 14 वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. यापाठोपाठ सीएनजीच्या दरात (CNG Rate Hike) चार रुपयांनी वाढ झाली असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
गेल्या महिनाभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचेही दर वाढले आहेत. यात पेट्रोल 10 रुपये 45 पैसे, तर डिझेल 10 रुपये 35 रुपये प्रति लिटर महागले आहे. तसेच सीएनजी 4 रुपये 4 पैसे रुपयांनी वाढले आहे. सध्या सीएनजी 67.9 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ केली आहे.
रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागला - पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर वाढल्याने आता थेट परिणाम प्रवासी भाडेवाढीवर झाला आहे. वारंवार इंधन वाढ होत असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अधिक भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याची झळ बसत आहे.
सरकारने भाव नियंत्रणात ठेवावे - दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत असल्याने आम्ही हैराण झालो आहे. सुरवातीला ऑफिसला जाताना आम्ही स्वतःचे वाहन वापरत होतो. मात्र, चार मित्र शेअरिंग मध्ये कारचा वापर करू लागलो आहे, अशीच दरवाढ होत राहिली तर गाड्या पार्किंगमध्ये उभ्या राहतील. सरकारने पेट्रोल,डिझेल सोबत सीएनजीच्या दरावर नियंत्रण ठेवावे असे वाहन चालकांनी सांगितलं आहे.
सीएनजीत 6.48 टक्के वाढ - मागील महिनाभरात सीएनजीच्या किमतीमध्येही प्रति किलो 63 रुपये 5 पैसे वरून 67 रुपये 9 पैसे पर्यंत वाढ झाली आहे. ही दरवाढ सुमारे 6.48 टक्के एवढी आहे.
आजचे भाव - पेट्रोल 120.87, डिझेल 103.54, सीएनजी 67,09 रुपये प्रति किलो