नाशिक - पेट्रोल बाटलीत देणे हा अपराध आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यात जिथे अशाप्रकारे पेट्रोलव्रिकी होत असेल, तिथे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसे आदेश पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी रात्री जिल्हा शासकीय रूग्णालयात जात, गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
हेही वाचा... हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, पेट्रोलद्वारे महिला गंभीररित्या भाजण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेत चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
पेट्रोल बाटलीत मिळणे, या नवीन घटना सध्या समोर येत आहेत. त्यातून पुढे असे प्रकार घडतात. पेट्रोल अशा प्रकारे विकणे हा अपराध आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यात जिथे अशाप्रकारे पेट्रोलव्रिकी होत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसे आदेश पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गंभीररित्या भाजलेल्या या महिलेची जळीत कक्षात जाऊन पाहणी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारून त्यांनी या निवेदनात करण्यात आलेल्या मागणीनुसार घटनेची सखोल चौकशी करून दोषी हल्लेखोरांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच घरातल्यांची चिंता करू नका, असा आधारही पीडितेला दिला.