नाशिक - कोरोनाचा प्रसार वाढत असताना कर्तव्यात कसूर करून परवानगी न घेता सुट्टी घेतल्यामुळे महापालिकेने या दोन कर्मचाऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जिल्ह्यात झालेली ही पहिलीच कारवाई असून कर्तव्यात कसुर करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा थेट संदेश या निमित्ताने महापालिका प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा - कसले मतभेद... लॉकडाऊनच्या निर्णयात आम्ही तर ठाकरें सोबतच - शरद पवार
नाशिक शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस आणि आरोग्य प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. असे असताना मनपाच्या द्वारका परिसरात असलेल्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दोन कर्मचार्यांना वारंवार सूचना देऊनही ते कर्तव्यावर हजर राहत नव्हते. अखेर, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेले हे दोन्ही कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून कामावर गैरहजर होते. दरम्यान रुग्णालयाच्यावतीने या दोघांनाही कामावर हजर राहण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही हे कर्मचारी कामावर हजर न झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांच्या तक्रारींनुसार साथरोग कायद्याअंतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांनी आपले काम जबाबदारीने करावे. तसेच कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शासनाच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसारच या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेला हा नाशिकमधील पहिलाच गुन्हा आहे. दरम्यान या कारवाईमुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.