नाशिक - करंसी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मात्र त्यानंतरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अखेर 13 जुलैला याप्रकरणी प्रेसच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडक सुरक्षा कवच आलेल्या करन्सी नोट प्रेसमधून पाचशे रुपयांच्या एक, दोन नाही तर तब्बल एक हजार नोटा चोरीस गेल्या आहेत. कोरोना काळात दिवसरात्र काम करून देशाला चलनी नोटांचा पुरवठा करण्याचे महत्वाचे काम या प्रेसमधून झाले,परंतु या प्रकरणामुळे येथील सुरक्षा व्यवस्था पुन्हा वाऱ्यावर असल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी करन्सी नोट प्रेसचे सहायक प्रबंधक अमित शर्मा यांनी उपनगर पोलीस ठाण्यात नोटा चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तेलगी प्रकरणानंतर नोट प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सीएनपीचे सहायक प्रबंधक अमित शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नोट प्रेसमधून पाच लाख रुपये चोरीला गेले आहेत. प्रेसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नसल्याने पॅकिंग बे सेक्शनमधील एखादा कामगार किंवा सुरक्षारक्षकांपैकी कोणीतरी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. हा प्रकार 12 फेब्रुवारी 2021 पासून उघडकीस आला होता. मात्र आतापर्यंत अंतर्गत गोपनीय तपास सुरू होता. मात्र या चौकशीत कुठलाही सुगावा लागला नाही. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री उशिरा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासणार सीसीटीव्ही..
चोरीच्या घटनेनंतर पोलीस प्रेसमधील सीसीटीव्ही कॅमेरेमधील फुटेज तपासणार असून केंद्रीय समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास देखील करणार आहे.