नाशिक - महानगरपालिकेची प्रभाग क्र.26 मधील पोटनिवडणूक काही दिवसांवर आली आहे. या प्रभागातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी जाहीर भाषणादरम्यान त्यांनी प्रतिस्पर्धी मनसेच्या उमेदवाराला लक्ष्य केले. मनसे हा पक्षच नसून बाळासाहेबांशी गद्दारी करणारे संपले आहेत, असे ते म्हणाले. ठाकरे नाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, असे वक्तव्य करून त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
'मी पाणी पुरवठा मंत्री झालोय, आणि पहिले पाणी नाशिकमध्येच पाजायला आलोयं', असा खोचक टोला त्यांनी लगावलायं. खुटवडमध्ये त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. मुस्लीम बांधवांचा भाजपने आजपर्यंत फक्त वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासूनच भाजपने जोरदार टीका सुरू केली. याला प्रत्युत्तर देताना, 'आमच्या पोराला तुम्ही काळे बोलणार आणि स्व:ताच्या मुलाला गोरं बोलणार', असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपने कोणाशीही युती केलेली चालते, असे ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजप भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरात पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.