नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रम्हगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी विशेष असे महत्त्व आहे. यादिवशी प्रदक्षिणा घालण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र, प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लावलेले असल्याने भाविकांना आज (सोमवार) ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालता आली नाही. यामुळे दुसऱ्यावर्षीही एसटी महामंडळाला ब्रम्हगिरीची विशेष फेरी ही रद्द करावी लागली. त्यामुळे महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
एसटीचे लाखोंचे नुकसान -
हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जय घोष करत दरवर्षी हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी येत असतात, मात्र कोरोनाचे निर्बंध लक्षात घेता यंदा दुसर्या वर्षीही प्रशासनाने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा रद्द केली आहे. यामुळे भाविकांना प्रदक्षिणेसाठी जाता आले नाही. दुसरीकडे ही प्रदक्षिणा रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भाविकांनी घेलते मंदिराच्या बंद दाराचे दर्शन -
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जिल्ह्यातून व राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी येत असतात, त्याचबरोबर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत असतात. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यंदा दुसऱ्या वर्षीही ब्रह्मगिरी फेरी रद्द केली आहे. तसेच अद्यापपर्यंत शासनाच्यावतीने मंदिर खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात न आल्यामुळे मंदिराची बंद आहेत, परिणामी तिसऱ्या सोमवारी देखील भाविकांना मंदिराच्या बंद दाराचे दर्शन घ्यावे लागत आहे.
इतर महादेव मंदिर देखील बंद -
तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील प्रसिद्ध कपालेश्वर, सोमेश्वर महादेव मंदिरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सोईसाठी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर व कपालेश्वर मंदिराच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन दर्शनाची सुविधा करण्यात आली होती.
ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेची आख्यायिका -
सुमारे आठशे वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांगितले आहे. तथापि प्रदक्षिणा तिसऱ्या सोमवारीच करावी हा नवा पायंडा सुमारे 20 वर्षांपासून रूढ झाला आहे. यामध्ये विविध प्रकारचे समज-गैरसमज आहेत. जसे सलग पाच वर्ष तिसऱ्या सोमवारची प्रदक्षिणा केली तर लाभ होतो, असा प्रचार झाला आहे. वास्तविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी सारखाच लाभ देणारी आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) सह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या तीनही प्रदक्षिणेत ब्रम्हगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालणे आहे. सुमारे वीस किलोमीटरचा हा मार्ग आता पक्का रस्ता झाला आहे. या मार्गावर कित्येक तीर्थ आहेत. त्यापैकी बहुतेक काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. प्रदक्षिणेला सुरुवात करतांना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठून कुशावर्तावर स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण केले जाते. म्हणजे साधारणत: पहाटे पाच वाजता ही प्रदक्षिणा सुरू करावी असे म्हटले जाते. सूर्योदय होतांना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत शिवाचे नामस्मरण करत प्रदक्षिणा करावी असे पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रा; मतदारांचे आशीर्वाद आणि संवाद बाजूला ठेऊन पक्षाची वातावरण निर्मिती