नाशिक - मखमलाबाद परिसरात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला स्थगिती देण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर स्थानिक शेतकऱ्यांची मते ऐकून प्रकल्प राबवण्याचे आदेश मनपाला देण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेला ग्रीन फिल्ड प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे.
नाशिक शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यातच मखमलाबाद परिसरात सातशेहून अधिक एकरात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात येणार असल्याने त्यांनी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.
काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी थेट मनपाच्या आवारात धडक देऊन आंदोलन केले. या प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची मते ऐकून निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिल्यानं शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
![nashik onion news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-rtu-smartcitydebate-mh10018_23102020095423_2310f_1603427063_1077.png)
मखमलाबाद याठिकाणी कित्येक शेतकरी गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. या शेतकऱ्यांना उपजिविकेचे इतर साधन नसल्याने जमीनीचाच आधार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रकल्पाला विरोध होत होता. तसेच हा प्रकल्प अनेक ठिकाणी शहराच्या बाहेर राबवण्यात आलेला असल्याने नाशिकमध्ये देखील याच प्रकारची मागणी होत होती. या मतावर हे शेतकरी ठाम असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत होणारा आणखी एक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.