नाशिक - नारायण राणे यांच्याबाबत अग्रलेख छापणाऱ्या सामनाचे संपादक संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा तसेच भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अद्यापही अटक न करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 25 ऑगस्ट) नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना 24 तासांत अटक करावी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड केली होती. दरम्यान, ही दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना 24 तासांत अटक करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. मात्र, चोवीस तास उलटूनही या शिवसैनिकांना अटक न करण्यात आल्याने भाजपच्या वतीने आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारा समोर ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी नारायण राणे यांच्याबाबत वादग्रस्त अग्रलेख छापणाऱ्या सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
नारायण राणे यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करणारे नाशिक पोलीस शिवसेनेच्या दबावाखाली काम करत आहेत - आमदार फरांदे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करणारे पोलीस प्रशासन देखील शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 24 तासांच्या आत पोलीस प्रशासनाने वसंत स्मृती कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक केली नाही तर याला भाजपकडून आक्रमक उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा राडा, 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल