नाशिक - रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून फ्लॅट पेटवून दिल्याने दोन महिला जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथील भाविक इमारतीत घडली. सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत असे पेट्रोलने दोन महिलांना जाळणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली, मात्र घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबत पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.
जाळलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक. . .
शिंदे नगर परिसरातील भाविक या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड (३९) हे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह एकूण दहा जण राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी त्यांच्या मावशी भारती गौड या आल्या होत्या. त्यांनतर बाराच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत (५२, रा. कुमावत नगर) हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात फेकायला सुरुवात केली. अचानकपणे घराला आग लावून देत तो फरार झाला. घरामध्ये प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (६५), आजोबा जानकीदास गौड (८५), पार्थ गौड (१५), चिराग गौड (३), मावशी भारती गौड (५५) हे होते. घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि घराला लागलेली आग पाहून पंधरा वर्षीय पार्थने बेडरूमचा दरवाजा लावून घेत आपल्या वडिलांना आणि आईला फोन लावून घटनेची माहिती दिली.
या आगीच्या घटनेमध्ये सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी गंभीररित्या भाजल्या आहेत. घराला लागलेली आग बघून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. तसेच, आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग इतकी भयानक होती की, घरातील सर्वच वस्तू जळाल्या. दरम्यान, घटनेतील संशयित सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत हा देखील भाजलेला असून, त्याला आणि भाजलेल्या महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.
पार्थच्या प्रसंगावधाने बचावला वयोवृद्ध आजोबा आणि तीन वर्षांच्या चिरागचा जीव
पार्थच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत वयोवृद्ध आजोबा आणि अवघ्या तीन वर्षांचा चिराग वाचला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत. या घटनेत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.