नाशिक - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांची पाठ फिरताच नाशिकमध्ये युवा अध्यक्षासह 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपामध्ये होणारे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी जयकुमार रावल यांच्या जागी पुन्हा प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांच्या हातात सूत्र देण्यात आली ( Girish Mahajan Incharge Nashik ) आहे. गिरीष महाजन हे सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी व्यस्त असून, त्यानंतर ते पदाची जबाबदारी स्वीकारतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री असताना महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता आली होती. त्यात महाजन यांचा सिहांचा वाटा होता. शुक्रवारी चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर हादरलेल्या भाजपाने तातडीने नाशिक प्रभारी म्हणून महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपावली आहे. भाजपाने हा निर्णय घेतला असला तरी, संकटमोचक महाजन यांच्या येण्याने बहुचर्चित नगरसेवकांची मोठी फूट टाळण्यात भाजपाला किती यश येते हे पाहावे लागेल.
म्हणून सूत्र रावल यांच्याकडे...
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर गिरीश महाजन हे रडारवर आले होते. बीएचआर घोटाळ्यात महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांना अटक झाल्यामुळे महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तसेच, अन्य काही प्रकरणांमध्ये देखील महाजन यांचे नाव चर्चेत आल्यामुळे भाजपाचे जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकची सूत्र देण्यात आली. मात्र, रावल शांत, मितभाषी आणि त्यांची पकडही महाजन यांच्यापेक्षा कमी होती. प्रभाग समिती निवडणुकीत भाजपा नगरसेवकांची फितुरी रोखण्यात रावल यांना यश आले नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर देखील ती खपवून घेतली जाते, असा संदेश भाजपात गेला होता.
महाजनांसाठी मीच आग्रही
गिरीश महाजन यांची नाशिक प्रभारी पदी नेमणूकीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माझा स्वत: त्यांना प्रभारी करावे म्हणून आग्रह होता. हा निर्णय पक्षाने माझ्याशी चर्चा करुन घेतला आहे. या निवडणुकीत पक्षाला नाशिक मध्ये यश मिळेल. प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपाला एकदा मोठे यश मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सहप्रभारी जयकुमार रावल यांनी सांगितले.
शहराध्यक्ष बाबत नाराजी
प्रभाग 9 च्या नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता तोच धागा पकडून पक्षातील अन्य नगरसेवक पालवे हटाव मोहीम राबविण्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांडेकर यांनी म्हटलं आहे की, किमान यापुढे तरी पक्षात महिला व सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्यांच्याकडे लक्ष दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.